Saturday, September 3, 2011

संपलं सगळं...

मी अश्या प्रकारे परत येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं... पण आले... त्या दिवशी सकाळपासून केशव घराबाहेर होता.. मीही हल्ली त्याच्या मागे लागणं सोडून दिलं होतं.. दोनच दिवसांपूर्वी सासूशी भांडण झालं होतं... भांडण म्हणजे ती मला खूप बडबडत होती.. तिला म्हटलं जरा हळू बोला, आवाज बाहेर जातोय.. तर मला म्हणाली, तू गप्प बैस.. मग माझ्याही तोंडून निघून गेलं ’तुम्ही गप्प बसा’... हे एव्हढंच...खरं तर अजूनपर्यंत तीला उलट उत्तर दिलं नव्हतं...पण कीती सहन करणार..केशव नीट वागला असता, तर वेगळी गोष्ट होती..पण तो सुधरायचं नाव काढत नव्हता.. ती अजूनही रागात होती.. संध्याकाळ झाली.. बाजूच्या सोसायटीतल्या त्याच्या एका मैत्रीणीचा फोन आला.. तुझा नवरा इथे पिऊन बसलाय.. त्याला घेऊन जा... तुझं ऐकेल तो.. मला माहीत होतं, तो ऐकणार नाही, पण इलाज नव्हता.. म्हणून गेले समजावयला.. पण तो ऐकला नाही... खूप बोलला मला.. मी त्याच्या आईला मानत नाही.. मी वाईट आहे.. माझ्याशी लग्न झाल्यापासून तो दु:खी आहे.. असं बरंच काही..रस्त्यावर तमाशा नको म्हणून, शेवटी एकटीच परत गेले.. मग रात्री १२ वाजता घरी आला तो... परत तेच बडबडणं, आता सासूचंही सुरु झालं.. म्हणाली ही नको माझ्या घरात.. ती हवी तर तूही बाहेर पड..सास-याला घर घेऊन द्यायला सांग.. मग हाही म्हणाला.. आईला नको तर मलाही तू नको.. जा इथून..बाबांना फोन करुन घेऊन जायला सांगतो..मी म्हटलं सकाळी फोन कर.. इतक्या रात्री त्यांना त्रास देऊ नको..पण नाही ऐकलं.. फोन केला बाबांना...माझ्या तक्रारी केल्या..मग सासूने फोन घेतला.. तीही बाबांना खूप बोलली.. बस झालं...आता माझी सहनशक्ती संपली होती...माझ्या बाबांना बोलण्याचा त्यांना काही अधिकार नव्हता..जिचा मुलगा स्वत: बेवडा होता, ती बाई माझ्या बाबांना विचारत होती, की काय संस्कार केलात आपल्या मुलीवर.. आणि केशव तिला साथ देत होता.. जीव विटला अक्षरश:... तशीच उठले.. बाहेर पडले.. पूर्ण रात्र घराबाहेर..उपाशीपोटी काढली... सकाळी वडीलांकडे परत आले... संपलं सगळं..

Monday, May 9, 2011

स्वर्ग सुख

लग्न झालं.. खूप खूप सुखात होते मी..वाटत होतं स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा..पण मोजून तीन दिवस हे सुख अनुभवलं.. तिस-या दिवशी केशवने स्वत:च सांगितलं.. तो डेली ड्रंकर आहे.. साध्या भाषेत तो दारुडा होता...खरं तर मोठा धक्का होता तो.. पण आमचं प्रेम होतं, एकमेकांवर...त्याने वचन दिलं.. तो दारु सोडणार.. पण इतक्या वर्षाची सवय, म्हणून वेळ लागेल.. खरं तर आमच्या घरात कुणीच दारु घेत नाहीत.. त्यामुळे दारुडे कसे असतात हेच माहीत नव्हतं... ते खोटे.. त्यांचं बोलणं खोटं... आणि त्यांची वचनही खोटी..हळूहळू समजायला लागलं.. दारु सोडणं शक्य नाहीय त्याला.. प्रेम अजूनही होतं, त्याचं माझ्यावर.. पण संध्याकाळ झाली की.. त्याचे पाय बरोबर तिथे वळत, सुरवातीला मी फोन केल्यावर तरी घरी यायचा.. नंतर नंतर ऎकेनासा झाला.. रात्रीचे २/३ वाजायचे.. मी फोन करुन करुन थकायचे पण तो यायचा नाही... सासू जेवून घ्यायची.. आणि झोपायची...मी वाट बघत थांबायची.. वाटायचं, मी जेवले तर तो जेवणार नाही.. उपाशी झोपेल.. मग उशिरा तो आल्यानंतर आमचा दिवस सुरु व्हायचा.. खूप लाडात यायचा मग.. आम्ही एकमेकांना भरवायचो...खूप गप्पा मारयचो.. पहाटेपर्यंत...त्याच्या प्रेमात तो मला चिंब चिंब भिजवून टाकायचा..

तसं त्याने मला कधीच काही गिफ्ट दिलं नाही.. एक नवीन साडीही घेतली नव्हती.. लग्नातसुद्धा मी ६ वर्षापूर्वीचा शालू नेसले होते.. पण माझी खरंच काही तक्रार नव्हती.. मी मात्र त्याला भरभरुन दिलं.. तन, मन आणि धनही त्याच्या स्वाधीन केलं मी..माझा लाडका नवरा होता तो.. माझं जे काही होतं, ते त्याचंच होतं.. फक्त एव्हढीच इच्छा होती की, त्याने दारु सोडावी.. किमान कमी तरी करावी..पण दिवसेंदिवस त्याचं पिणं वाढत होते.. आणि त्याच माझ्यावर प्रेम आहे या एकाच समजुतीवर मी सगळं नजरेआड करत होते..खरं तर आता विचार करताना मी स्वत:लाच हा प्रश्न विचारते की, ते खरंच प्रेम होतं का? आणि जर असेल.. तर तो आज आपल्याबरोबर का नाही..

तसं सुख म्हणावं तर, फक्त त्याच्याकडून.. सासू अगदि रागात असायची.. वाटायचं या बाईच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न झालंय.. मग आनंद का दिसत नाही चेह-यावर.. ऎन लग्नात माझ्या सासूच्या आणि मोठ्या नणंदेच्या चेह-यावर अगदि सुतकी कळा पसरली होती.. पण वाटलं.. असतो एकेकचा स्वभाव.. खरं तर तोपर्यंत माझ्याशी कुणीच वाईट वागलेलं नाव्हतं.. म्हणून म्हटलं.. होईल हळू हळू राग कमी..पण आल्यादिवसांपासून सासू जी माझ्या मागे लागली.. की जशी गेल्या जन्मीची वैरीण.. माझ्यात एक गुण दिसत नव्हता तिला.. फक्त नावं ठेवायची.. माझ्या माहेरी मला कुणीच कधी वाईट बोललं नव्हती.. बाहेरही सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं... हीच एक जिला माझ्यात, अनेक उणिवा दिसत होत्या.. माझ्या वागण्यावरुन.. दिसण्यावरून... माझ्या अपंगत्वावरून (खरं तर केशवही अपंग होता)...काम करण्यावरुन..जेवण करण्यावरुन..इतकंच काय.. कमी जेवण्यावरून ही वाद करायची..टोमणे मारायची... एकदा तर काय.. मी फक्त भांडी घासली म्हणून, घर डोक्यावर घेतलं तिनं.. तिने नको म्हटलं असतानाही घासली म्हणून..अशी मी काही सहन करणारी मुलगी नव्हते.. पण का कुणास ठाऊक.. मी तिला तरी कधी उलटून बोलले नव्हते...

पण हळूहळू कंटाळा यायला लागला..इतकंच काय आत्मविश्वासही डळमळीत व्हायला लागला.. तशी मी स्मार्ट आहे थोडीफार.. पण तेव्हा साधी सही करतानाही माझा हात थरथरायला लागला... माहेरच्यांना सगळं माहीत होतं.. बाबा सोडले तर प्रत्येकजण सांगत होता.. परत ये.. परत ये...