Saturday, September 3, 2011

संपलं सगळं...

मी अश्या प्रकारे परत येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं... पण आले... त्या दिवशी सकाळपासून केशव घराबाहेर होता.. मीही हल्ली त्याच्या मागे लागणं सोडून दिलं होतं.. दोनच दिवसांपूर्वी सासूशी भांडण झालं होतं... भांडण म्हणजे ती मला खूप बडबडत होती.. तिला म्हटलं जरा हळू बोला, आवाज बाहेर जातोय.. तर मला म्हणाली, तू गप्प बैस.. मग माझ्याही तोंडून निघून गेलं ’तुम्ही गप्प बसा’... हे एव्हढंच...खरं तर अजूनपर्यंत तीला उलट उत्तर दिलं नव्हतं...पण कीती सहन करणार..केशव नीट वागला असता, तर वेगळी गोष्ट होती..पण तो सुधरायचं नाव काढत नव्हता.. ती अजूनही रागात होती.. संध्याकाळ झाली.. बाजूच्या सोसायटीतल्या त्याच्या एका मैत्रीणीचा फोन आला.. तुझा नवरा इथे पिऊन बसलाय.. त्याला घेऊन जा... तुझं ऐकेल तो.. मला माहीत होतं, तो ऐकणार नाही, पण इलाज नव्हता.. म्हणून गेले समजावयला.. पण तो ऐकला नाही... खूप बोलला मला.. मी त्याच्या आईला मानत नाही.. मी वाईट आहे.. माझ्याशी लग्न झाल्यापासून तो दु:खी आहे.. असं बरंच काही..रस्त्यावर तमाशा नको म्हणून, शेवटी एकटीच परत गेले.. मग रात्री १२ वाजता घरी आला तो... परत तेच बडबडणं, आता सासूचंही सुरु झालं.. म्हणाली ही नको माझ्या घरात.. ती हवी तर तूही बाहेर पड..सास-याला घर घेऊन द्यायला सांग.. मग हाही म्हणाला.. आईला नको तर मलाही तू नको.. जा इथून..बाबांना फोन करुन घेऊन जायला सांगतो..मी म्हटलं सकाळी फोन कर.. इतक्या रात्री त्यांना त्रास देऊ नको..पण नाही ऐकलं.. फोन केला बाबांना...माझ्या तक्रारी केल्या..मग सासूने फोन घेतला.. तीही बाबांना खूप बोलली.. बस झालं...आता माझी सहनशक्ती संपली होती...माझ्या बाबांना बोलण्याचा त्यांना काही अधिकार नव्हता..जिचा मुलगा स्वत: बेवडा होता, ती बाई माझ्या बाबांना विचारत होती, की काय संस्कार केलात आपल्या मुलीवर.. आणि केशव तिला साथ देत होता.. जीव विटला अक्षरश:... तशीच उठले.. बाहेर पडले.. पूर्ण रात्र घराबाहेर..उपाशीपोटी काढली... सकाळी वडीलांकडे परत आले... संपलं सगळं..