नितळनंतर बऱ्याच दिवसांनी लिहीतेय.. जवळजवळ दोन वर्षे झाली.. पण खर तर गेल्या दोन वर्षात खूप काही घडून गेलं, आणि या घटनांचा वेगही असा अफाट होता की मी कुठे आहे.. काय चाललंय हे समजतच नव्ह्तं.. काय चूक काय बरोबर.. कोण चांगल कोण वाईट हे सुद्धा ठरविता येत नव्ह्ते..पण आता परीस्थिती ह्ळूह्ळू का होइना पूर्वपदावर येतेय..
दि. ६ जून २००७, हॉटेल सरोवर, केशवने भेटायला बोलावलं होतं.. खर तर केशव हे त्याच दुसरं नाव आहे.. पण सोयीसाठी मी तेच वापरणार आहे. केशव मला शादी डॉट कॉम वर भेटला, तोही अपंग आहे.. अपघातात त्याचा एक पाय गेला आहे.. कमाई बऱ्यापैकी, स्वत:चा फ्लॅट आहे.. त्याला आज भेटायच ठरलंय, ऑफीसमधून परस्पर निघालेय.. हॉटेल सरोवरसमोर उतरले.. केशव म्हणालेला तो दरवाज्यापाशीच उभा असेल.. पण मग दिसत का नाहीय.. सेल वर फोन केला.. तेव्हा कळलं.. हॉटेलला दोन दरवाजे आहेत.. आणि तो नेमका दुसऱ्या दरवाज्यापाशी उभा आहे.. फोनवर बोलत बोलत समोर आला.. लाईट यलो कलरचं शर्ट.. ब्राउन पॅन्ट, गोरा.. उंच.. देखणी पर्सनॅलिटी.. पण पर्सनॅलिटीचं काय करायचंय.. लग्न करायचं तर स्वभाव चांगला हवा.. तोही कळेलंच म्हणा आता... आत जाऊन बसलो.. खूप बोलका होता तो. मी तशी बुजरी आहे.. फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.. तो मात्र खूप खुष दिसत होता. बरच काही सांगत होता. म्हणाला कुण्या ज्योतिषाने सांगितलेय उत्तरेला भेटाल तर लग्न जमेल.. खरं तर थोडं हसूच आलं, म्हणजे आपणही ज्योतिष्याकडे जातो पण असं कुणाला एकदम सांगत नाही ना.. पण म्ह्टल मनाने साफ दिसतोय.. अजूनही घराबद्द्ल.. आई, वडील.. बहीणींबद्दलही सांगितलं.. स्वत:बद्दलही बोलत होता.. मला जाणवलं थोडासा.. अहंकार आहे.. पण त्याच अदबीने वागणं.. आपलेपणाने बोलणं या सगळ्याची एक भुरळ पडत गेली.
जवळजवळ दीड तास आम्ही बोलत होतो.. वेळ कसा गेला समजलच नाही.. शेवटी म्हणाला मला तू पसंत आहेस पण आईला, बहीणींना विचारावं लागेल.. अर्थात मलाही घरच्याची परवानगी घ्यायची होतीच.. तेव्हा घरातल्यांना सांगून निर्णय घ्यायचा असं ठरलं.. मग बाहेर पडलो..म्हणाला स्टॉपपर्यंत सोडायला येतो.. म्हटलं चालेल.. मग सांगायला लागला, त्याची इच्छा आहे की मी त्याच्या मित्राला भेटावं जो त्याच्याच इमारतीत राह्तो.. सरळ सांगितलं नाही, पण लहान मुलासारख़ा कुरकुरत होता.. म्हटलं चल तुझ्या मनासारखं होउदे.. भेटले त्याच्या मित्राला.. मग म्हटल आता जाईन मी एकटी.. पण नाही.. परत सोडायला आला.. बसमध्ये चढताना म्हणाला घरी पोचलीस की फोन कर.. हात दाखवला.. बस सुरु झाली.. खूपच इम्प्रेस झाले होते..वाटल.. लग्नाचं नाहीच जमल तर एक चांगला मित्र होउ शकेल हा...
मग सुरु झाले फोनवर फोन, नेहमी मीच करायचे, पण कधी कधी मनात यायचं.. त्याला वाटतंय का बोलावस.. बघू या.. मग त्याचा फोन यायचा.. खूप बोलायचा तो.. मलाही आवडायचं.. शेवटी लग्न ठरलं.. मी खूप खुष होते, मला अगदी मनासारखा साथीदार मिळाला होता...आणि तोही असंच म्हणत होता. माझं मन म्हणाल ज्याच्यासाठी जीवनातल्या सगळ्या दु:खांबरोबर लढावसं वाटेल तो हाच..लग्न झालं.. कीतीतरी दिवसांपासून जपलेलं स्वप्न पूर्ण झालं.. आई, बाबा, ताई-भावोजी, भाऊ, बहीण, भाचा सगळेच खुष होते.