Saturday, September 3, 2011

संपलं सगळं...

मी अश्या प्रकारे परत येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं... पण आले... त्या दिवशी सकाळपासून केशव घराबाहेर होता.. मीही हल्ली त्याच्या मागे लागणं सोडून दिलं होतं.. दोनच दिवसांपूर्वी सासूशी भांडण झालं होतं... भांडण म्हणजे ती मला खूप बडबडत होती.. तिला म्हटलं जरा हळू बोला, आवाज बाहेर जातोय.. तर मला म्हणाली, तू गप्प बैस.. मग माझ्याही तोंडून निघून गेलं ’तुम्ही गप्प बसा’... हे एव्हढंच...खरं तर अजूनपर्यंत तीला उलट उत्तर दिलं नव्हतं...पण कीती सहन करणार..केशव नीट वागला असता, तर वेगळी गोष्ट होती..पण तो सुधरायचं नाव काढत नव्हता.. ती अजूनही रागात होती.. संध्याकाळ झाली.. बाजूच्या सोसायटीतल्या त्याच्या एका मैत्रीणीचा फोन आला.. तुझा नवरा इथे पिऊन बसलाय.. त्याला घेऊन जा... तुझं ऐकेल तो.. मला माहीत होतं, तो ऐकणार नाही, पण इलाज नव्हता.. म्हणून गेले समजावयला.. पण तो ऐकला नाही... खूप बोलला मला.. मी त्याच्या आईला मानत नाही.. मी वाईट आहे.. माझ्याशी लग्न झाल्यापासून तो दु:खी आहे.. असं बरंच काही..रस्त्यावर तमाशा नको म्हणून, शेवटी एकटीच परत गेले.. मग रात्री १२ वाजता घरी आला तो... परत तेच बडबडणं, आता सासूचंही सुरु झालं.. म्हणाली ही नको माझ्या घरात.. ती हवी तर तूही बाहेर पड..सास-याला घर घेऊन द्यायला सांग.. मग हाही म्हणाला.. आईला नको तर मलाही तू नको.. जा इथून..बाबांना फोन करुन घेऊन जायला सांगतो..मी म्हटलं सकाळी फोन कर.. इतक्या रात्री त्यांना त्रास देऊ नको..पण नाही ऐकलं.. फोन केला बाबांना...माझ्या तक्रारी केल्या..मग सासूने फोन घेतला.. तीही बाबांना खूप बोलली.. बस झालं...आता माझी सहनशक्ती संपली होती...माझ्या बाबांना बोलण्याचा त्यांना काही अधिकार नव्हता..जिचा मुलगा स्वत: बेवडा होता, ती बाई माझ्या बाबांना विचारत होती, की काय संस्कार केलात आपल्या मुलीवर.. आणि केशव तिला साथ देत होता.. जीव विटला अक्षरश:... तशीच उठले.. बाहेर पडले.. पूर्ण रात्र घराबाहेर..उपाशीपोटी काढली... सकाळी वडीलांकडे परत आले... संपलं सगळं..

Monday, May 9, 2011

स्वर्ग सुख

लग्न झालं.. खूप खूप सुखात होते मी..वाटत होतं स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा..पण मोजून तीन दिवस हे सुख अनुभवलं.. तिस-या दिवशी केशवने स्वत:च सांगितलं.. तो डेली ड्रंकर आहे.. साध्या भाषेत तो दारुडा होता...खरं तर मोठा धक्का होता तो.. पण आमचं प्रेम होतं, एकमेकांवर...त्याने वचन दिलं.. तो दारु सोडणार.. पण इतक्या वर्षाची सवय, म्हणून वेळ लागेल.. खरं तर आमच्या घरात कुणीच दारु घेत नाहीत.. त्यामुळे दारुडे कसे असतात हेच माहीत नव्हतं... ते खोटे.. त्यांचं बोलणं खोटं... आणि त्यांची वचनही खोटी..हळूहळू समजायला लागलं.. दारु सोडणं शक्य नाहीय त्याला.. प्रेम अजूनही होतं, त्याचं माझ्यावर.. पण संध्याकाळ झाली की.. त्याचे पाय बरोबर तिथे वळत, सुरवातीला मी फोन केल्यावर तरी घरी यायचा.. नंतर नंतर ऎकेनासा झाला.. रात्रीचे २/३ वाजायचे.. मी फोन करुन करुन थकायचे पण तो यायचा नाही... सासू जेवून घ्यायची.. आणि झोपायची...मी वाट बघत थांबायची.. वाटायचं, मी जेवले तर तो जेवणार नाही.. उपाशी झोपेल.. मग उशिरा तो आल्यानंतर आमचा दिवस सुरु व्हायचा.. खूप लाडात यायचा मग.. आम्ही एकमेकांना भरवायचो...खूप गप्पा मारयचो.. पहाटेपर्यंत...त्याच्या प्रेमात तो मला चिंब चिंब भिजवून टाकायचा..

तसं त्याने मला कधीच काही गिफ्ट दिलं नाही.. एक नवीन साडीही घेतली नव्हती.. लग्नातसुद्धा मी ६ वर्षापूर्वीचा शालू नेसले होते.. पण माझी खरंच काही तक्रार नव्हती.. मी मात्र त्याला भरभरुन दिलं.. तन, मन आणि धनही त्याच्या स्वाधीन केलं मी..माझा लाडका नवरा होता तो.. माझं जे काही होतं, ते त्याचंच होतं.. फक्त एव्हढीच इच्छा होती की, त्याने दारु सोडावी.. किमान कमी तरी करावी..पण दिवसेंदिवस त्याचं पिणं वाढत होते.. आणि त्याच माझ्यावर प्रेम आहे या एकाच समजुतीवर मी सगळं नजरेआड करत होते..खरं तर आता विचार करताना मी स्वत:लाच हा प्रश्न विचारते की, ते खरंच प्रेम होतं का? आणि जर असेल.. तर तो आज आपल्याबरोबर का नाही..

तसं सुख म्हणावं तर, फक्त त्याच्याकडून.. सासू अगदि रागात असायची.. वाटायचं या बाईच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न झालंय.. मग आनंद का दिसत नाही चेह-यावर.. ऎन लग्नात माझ्या सासूच्या आणि मोठ्या नणंदेच्या चेह-यावर अगदि सुतकी कळा पसरली होती.. पण वाटलं.. असतो एकेकचा स्वभाव.. खरं तर तोपर्यंत माझ्याशी कुणीच वाईट वागलेलं नाव्हतं.. म्हणून म्हटलं.. होईल हळू हळू राग कमी..पण आल्यादिवसांपासून सासू जी माझ्या मागे लागली.. की जशी गेल्या जन्मीची वैरीण.. माझ्यात एक गुण दिसत नव्हता तिला.. फक्त नावं ठेवायची.. माझ्या माहेरी मला कुणीच कधी वाईट बोललं नव्हती.. बाहेरही सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं... हीच एक जिला माझ्यात, अनेक उणिवा दिसत होत्या.. माझ्या वागण्यावरुन.. दिसण्यावरून... माझ्या अपंगत्वावरून (खरं तर केशवही अपंग होता)...काम करण्यावरुन..जेवण करण्यावरुन..इतकंच काय.. कमी जेवण्यावरून ही वाद करायची..टोमणे मारायची... एकदा तर काय.. मी फक्त भांडी घासली म्हणून, घर डोक्यावर घेतलं तिनं.. तिने नको म्हटलं असतानाही घासली म्हणून..अशी मी काही सहन करणारी मुलगी नव्हते.. पण का कुणास ठाऊक.. मी तिला तरी कधी उलटून बोलले नव्हते...

पण हळूहळू कंटाळा यायला लागला..इतकंच काय आत्मविश्वासही डळमळीत व्हायला लागला.. तशी मी स्मार्ट आहे थोडीफार.. पण तेव्हा साधी सही करतानाही माझा हात थरथरायला लागला... माहेरच्यांना सगळं माहीत होतं.. बाबा सोडले तर प्रत्येकजण सांगत होता.. परत ये.. परत ये...

Monday, May 4, 2009

माझं लग्न

नितळनंतर बऱ्याच दिवसांनी लिहीतेय.. जवळजवळ दोन वर्षे झाली.. पण खर तर गेल्या दोन वर्षात खूप काही घडून गेलं, आणि या घटनांचा वेगही असा अफाट होता की मी कुठे आहे.. काय चाललंय हे समजतच नव्ह्तं.. काय चूक काय बरोबर.. कोण चांगल कोण वाईट हे सुद्धा ठरविता येत नव्ह्ते..पण आता परीस्थिती ह्ळूह्ळू का होइना पूर्वपदावर येतेय..

दि. ६ जून २००७, हॉटेल सरोवर, केशवने भेटायला बोलावलं होतं.. खर तर केशव हे त्याच दुसरं नाव आहे.. पण सोयीसाठी मी तेच वापरणार आहे. केशव मला शादी डॉट कॉम वर भेटला, तोही अपंग आहे.. अपघातात त्याचा एक पाय गेला आहे.. कमाई बऱ्यापैकी, स्वत:चा फ्लॅट आहे.. त्याला आज भेटायच ठरलंय, ऑफीसमधून परस्पर निघालेय.. हॉटेल सरोवरसमोर उतरले.. केशव म्हणालेला तो दरवाज्यापाशीच उभा असेल.. पण मग दिसत का नाहीय.. सेल वर फोन केला.. तेव्हा कळलं.. हॉटेलला दोन दरवाजे आहेत.. आणि तो नेमका दुसऱ्या दरवाज्यापाशी उभा आहे.. फोनवर बोलत बोलत समोर आला.. लाईट यलो कलरचं शर्ट.. ब्राउन पॅन्ट, गोरा.. उंच.. देखणी पर्सनॅलिटी.. पण पर्सनॅलिटीचं काय करायचंय.. लग्न करायचं तर स्वभाव चांगला हवा.. तोही कळेलंच म्हणा आता... आत जाऊन बसलो.. खूप बोलका होता तो. मी तशी बुजरी आहे.. फक्त त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.. तो मात्र खूप खुष दिसत होता. बरच काही सांगत होता. म्हणाला कुण्या ज्योतिषाने सांगितलेय उत्तरेला भेटाल तर लग्न जमेल.. खरं तर थोडं हसूच आलं, म्हणजे आपणही ज्योतिष्याकडे जातो पण असं कुणाला एकदम सांगत नाही ना.. पण म्ह्टल मनाने साफ दिसतोय.. अजूनही घराबद्द्ल.. आई, वडील.. बहीणींबद्दलही सांगितलं.. स्वत:बद्दलही बोलत होता.. मला जाणवलं थोडासा.. अहंकार आहे.. पण त्याच अदबीने वागणं.. आपलेपणाने बोलणं या सगळ्याची एक भुरळ पडत गेली.
जवळजवळ दीड तास आम्ही बोलत होतो.. वेळ कसा गेला समजलच नाही.. शेवटी म्हणाला मला तू पसंत आहेस पण आईला, बहीणींना विचारावं लागेल.. अर्थात मलाही घरच्याची परवानगी घ्यायची होतीच.. तेव्हा घरातल्यांना सांगून निर्णय घ्यायचा असं ठरलं.. मग बाहेर पडलो..म्हणाला स्टॉपपर्यंत सोडायला येतो.. म्हटलं चालेल.. मग सांगायला लागला, त्याची इच्छा आहे की मी त्याच्या मित्राला भेटावं जो त्याच्याच इमारतीत राह्तो.. सरळ सांगितलं नाही, पण लहान मुलासारख़ा कुरकुरत होता.. म्हटलं चल तुझ्या मनासारखं होउदे.. भेटले त्याच्या मित्राला.. मग म्हटल आता जाईन मी एकटी.. पण नाही.. परत सोडायला आला.. बसमध्ये चढताना म्हणाला घरी पोचलीस की फोन कर.. हात दाखवला.. बस सुरु झाली.. खूपच इम्प्रेस झाले होते..वाटल.. लग्नाचं नाहीच जमल तर एक चांगला मित्र होउ शकेल हा...
मग सुरु झाले फोनवर फोन, नेहमी मीच करायचे, पण कधी कधी मनात यायचं.. त्याला वाटतंय का बोलावस.. बघू या.. मग त्याचा फोन यायचा.. खूप बोलायचा तो.. मलाही आवडायचं.. शेवटी लग्न ठरलं.. मी खूप खुष होते, मला अगदी मनासारखा साथीदार मिळाला होता...आणि तोही असंच म्हणत होता. माझं मन म्हणाल ज्याच्यासाठी जीवनातल्या सगळ्या दु:खांबरोबर लढावसं वाटेल तो हाच..लग्न झालं.. कीतीतरी दिवसांपासून जपलेलं स्वप्न पूर्ण झालं.. आई, बाबा, ताई-भावोजी, भाऊ, बहीण, भाचा सगळेच खुष होते.

Thursday, April 19, 2007

नितळ

'नितळ' हे नाव आहे नवीन पिक्चर'चं.. आत्ताच स्टोरी वाचली त्याची.. माझ्या आयुष्याशी अगदि जुळणारी आहे त्या नायिकेची कहाणी..आणि योगायोगाने आज लोडशेडींग ही नाहीय.. आणि शिवाय कामही नाही आलय अजून.. थोडक्यात सांगायचं तर.. आत्ता जे वाटतंय ते लिहायला आवडही आहे अणि सवडही..
त्या पिक्चर मध्ये एक कोड अलेल्या मुलीची गोष्ट आहे.. ती डॉक्टर आहे.. सुंदर आहे.. गुणी मनमिळावू.. पण एक 'कोड आहे' हे वाक्य तिच्या सगळ्या गुणांची माती करुन टाकतो.. आणि अगदी असच होतय माझ्याबाबतीत.. मला कोड नाही पण मी अपंग आहे.. एका पायाने.. अर्थात मी चालू शकते.. फिरु शकते.. कुणाचीही मदत न घेता रोजची कामं करणं मला सहज शक्य आहे.. पण गेले ४-५ वर्ष भरपूर अनुभवतेय.. त्या नायिकेसारखचं.. म्हणजे माझ्या लग्ना संदर्भात.. मि ग्रॅज्युएट आहे.. हुशार आहे.. दिसायलाही चार चौघीं पेक्षा सुंदर आहे.. कमावते बऱ्यापैकी.. प्लॅस आई वडील वेल-स्टेटस असलेले आहेत.. पण या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत.. कारण माझा पाय असा आहे..
एक माणूस आहे (आता माणूसच म्हणावं लागतंय.. कारण मुलगा/ तरुण नाही म्हणता येणार.. आणि पुरुष म्हणणं अगदीच ऑड वाटतं.. तर तो माणूस आहे माझ्यासारखाच. हॅन्डिकॅप.. एका पायाने.. तोही शिकलेला.. वेल सेट्ल आहे.. माझ्यासाठी परफेक्ट मॅच.. पण त्याला मी नकोय.. कारण एकच त्याला हॅन्डिकॅप नसलेली मुलगी हवीय.. एकीकडे हि तऱ्हा तर दुसरी कडे अजूनच दुसरी.. साधारण २-३ वर्षापूर्वी एक माणूस मला येऊन भेटलेला.. तो विवाहीत होता.. तरी त्याला माझ्याशी दुसर लग्न करायच होतं.. माझा उध्दार करयचा होता.. साहजिकच मी नाही म्हटलं.. वडीलांशीही कॉन्टक्ट केलेलं त्याने.. जाऊ दे झालं.. अजून एक गेल्या वर्षी संपर्कात आला होता.. हातीपायी धड.. पण शिकलेला होता.. जॉब होता साधासा.. पण त्याच्यापुर्ती ठीक होता.. त्यालाही एक महान सामाजिक कर्य करायच होत.. माझ्याशी लग्न करुन.. त्याला माझ्याशी लग्नाच्या बदल्यात घर हव होत.. तेही मान्य केल.. पण घर मोठंच हव.. मी त्यासाठी लोन काढायचं नाही.. अश्या एक ना अनेक कंडीशन्स होत्या.. झालं एक दिवस मन उडालं.. तस अजूनही बोलतो आम्ही.. पण तेच सगळं.. मग मला वाटतं तोपर्यंत बोलते.. नाहीच तर फोन करायचा बंद करते.. सिंपल..
तर हे अस सगळं.. सगळ्यानिंच बाजार मांडलेला.. हे असंच चालायचं.. चालू दे.. काय फरक पडतो.. प्रत्येक गोष्टीत दोनच ऑप्शन असतात.. + व्हिव ओर - व्हिव.. तेंव्हा मी याचा जास्त विचार करत नाही.. एकतर माझ लग्न होईल.. किंवा मीच या सगळ्या वृत्तींना.. माणसांना.. वैतागून जाईन.. लग्न न करणं सुखाच वाटेल मग मला.. बघूया आता काय होतंय ते..

Thursday, March 8, 2007

Sheevsaineek

खूप शोधल.. पण सापडतच नाहिय.. मराठीमध्ये ब्लॉग कसा लिहायचा ते.. आणि विचाराव तरी कुणाला???.. असू दे, ते समजत नाहि.. तो पर्यंत असाच लिहू या.. बरोबर ना.. आज XXX चि आठवण येतेय.. गेला आठवडाभर फोन नाही केलाय.. पण त्याचही काही समजत नाही.. म्हणजे फोन केला तर अगदी छान बोलतो.. म्हणजे एखाद्या मित्रा सारखा.. खर तर मित्रापेक्षा जास्तच अहे तो.. हे त्यालही माहीतेय नी मलाही.. लग्न जुळवण्या-या एका साईटवरुन आमची ओळख झाली आहे..खूप आश्वासनात्मक बोललेला तो माझ्याशी..कधी कधी अगदी विक्षिप्त वाटतो.. आणि कधी कधी खूप खोटरडा.. पण तरीही मी फिरुन फिरुन त्याच्याकडे जाते.. मला वाटतं आम्ही एकमेकांना चांगल समजून घेऊ..तसं अगदी हाच नवरा हवा असं काही नाहीय माझं..मला दुसरा ऑप्शन मिळाला की मी नक्की विसरु शकेन त्याला.. किंवा असं म्हणता येइल की त्याची आठवण त्रासदायक नसेल.. विसरायच तरी कस त्याला.. कारण इतकी वर्ष माझ्या जोडीदाराला चेहरा नव्हता.. तो त्याने दिलाय..जेंव्हा जेंव्हा लग्नची गोष्ट निघते तो आठवतो.. मी कधी कधी त्याला फोन करते... मध्ये जवळ जवळ ४ महीने गेलेले असतात... खरच त्याच्यात काहीच बदल झालेला नसतो.. अणि कदाचित हेच आवडतं मला.. काय हवय त्याला.. का तो माघार घेत राहतो.. खूप विचारावसं वाटत.. पन शब्द फुटत नाहीत.. वाटत कदाचित खर बोलेल तर सहन नाहि होणार.. पन असही नाही.. बोलायलाच जमत नाहि हेच खर.. त्याच स्वभाव अगदी चकली सारखा आहे.. वेटोळे वेटोळे घेत बोलतो तो.. मग राग येतो..
वाटतं तो नुसता टाइमपास करतोय..कारण तो ज्या गोष्टीसाठी माझ्याकडे आलेला ती सोडून तो जगभराच्या गोष्टी बोलतो.. म्हणजे लग्न नको असं म्हणत नाही.. पण केव्हा करायचं ते बोलत नाही..भेटायलाही बोलावतो.. तसं त्याच्या मित्राशीही बोललेय मी.. पण तरीही वाटतं.. कदाचित हा आपला फायदा घेत असावा..पण ठोस निर्णय घ्यायची अजून वेळ नाही आलीय.. म्हणून गप्प बसते..बघू आता काय होतं ते...

Tuesday, January 16, 2007

माझं लिखाण

खरं तर खूप दिवसापासून वाटतय काहीतरी लिहावं म्हणून.. कोलेज सोडल्यापासून काहि लिहिणं अस झालच नाहि.. आणि आता तर फक्त सही करण्यापुरत पेन हाती घेते.. पण तरीही हल्ली वाटत मनात कितीतरी विचार येतात.. सगळेच नाहि ना आपण कुणाला सांगू शकत.. हे छान आहे.. हल्लीच वाचलय कुठेतरी.. आपल्याला जे काहि बोलावस वाटतं.. मान.. स्पेशिअली अपमान जे अपण इतरांना नही सांगू शकत ते एका कागदावर लिहायचे.. आणि मग.. मग तो कागद फाडून टाकायचा.. मन मोकळ करणं खरचं अस सोपं असत का??